नवी दिल्ली : संशयास्पद अवस्थेत आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह सापडला होता. हा मृतदेह महंत नरेंद्र गिरी यांच्या अल्लापूर या येथील बाघंबरी या ठिकाणच्या निवासस्थानी सापडला असून पंख्याला लटकून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. महंत नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरी याला त्या ठिकाणी सापडलेल्या सुसाईड नोटवरुन पोलिसांनी अटक केली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या हा वाद सुरु असताना आखाडा परिषदेतील संपत्तीचा वाद समोर आल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.
आपल्या सुसाईड नोटमध्ये शिष्य आनंद गिरी हा आपल्याला त्रास देत असल्याचे महंत नरेंद्र गिरी यांनी म्हटले आहे. तसेच या नोटमध्ये आपला वारस कोण असावा, मठ आणि आश्रममध्ये भविष्यात कशा प्रकारचे काम करण्यात यावे, कशा प्रकारची व्यवस्था असावी या सगळ्याची माहिती दिली आहे. महंत नरेंद्र गिरी यांची सुसाईड नोट ही एक प्रकारचे मृत्यूपत्रच असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आपल्या सुसाईड नोटमध्ये महंत नरेंद्र गिरी यांनी यापुढे मठाची जबाबदारी कोणाकडे देण्यात यावी हे सविस्तरपणे लिहिले आहे. त्यामध्ये शिष्य आनंद आपल्याला त्रास देत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्याआधारे आनंद गिरीला पोलिसांनी अटक केली आहे. पण त्या आधीच आनंद गिरीने माध्यमांशी बोलताना सांगितले आहे की, महंत नरेंद्र गिरी यांची ही आत्महत्या नसून ती हत्या आहे. यामध्ये कुणाचा सहभाग आहे, याचा खुलासा पोलिसांनी करावा, असेही त्यांनी म्हटले होते. या प्रकरणात जर आपण दोषी सापडलो, तर आपल्याला कायद्याप्रमाणे शिक्षा देण्यात यावी, असे आनंद गिरी यांनी आधीच स्पष्ट केले होते.
महंत नरेंद्र गिरी आणि त्यांचा शिष्य आनंद यांच्यात यापूर्वी देखील एकदा वाद झाला होता. या वादाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यानंतर आनंद गिरीने महंत नरेंद्र गिरी यांची माफी मागितली आणि या प्रकरणावर पडदा टाकला. दरम्यान महंत नरेंद्र गिरी यांच्या मृतदेहाचे पोर्टमार्टम करण्यात आले असून त्याच्या अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या अहवालावरुन महंत नरेंद्र गिरी यांची आत्महत्या की हत्या याचा खुलासा होणार आहे.






