रजनी पाटील, संजय उपाध्याय राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात; दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा यांना डावलले

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने माजी खासदार रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. तर भाजपने संजय उपाध्याय यांना रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या अर्ज दाखल करण्याचा दिवस आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू अशी रजनी पाटील यांची ओळख आहे. रजनी पाटील या वसंतदादा पाटील यांच्या मानसकन्या असून मूळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. विवाहानंतर त्या मराठवाड्यात स्थायिक झाल्या. माजी क्रीडा राज्यमंत्री अशोक पाटील यांच्या त्या पत्नी. बीडमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. दुसरीकडे भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. ते मुंबई भाजपचे सरचिटणीस आहेत. २०१७ मध्ये ते महापालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाले होते. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपने हिंदी भाषक चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे.

राज्यसभेच्या एका जागेसाठी काँगेसमधले अनेक जण प्रयत्नशील होते.स्व.राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांच्यासह वरिष्ठ काँगेस नेते गुलाम नबी आझाद हेही महाराष्टातून राज्यसभेवर जाण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याशिवाय मुकुल वासनिक व अविनाश पांडे यांनीही आपापल्या पद्धतीने लॉबिंग केले होते. मध्यंतरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही राज्यसभेच्या या जागेसाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, प्रत्यक्षात या सर्वांवर मात करत रजनी पाटील यांनी उमेदवारी मिळवली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here