ते मुख्यमंत्रिपदाच्या लायक नाहीत; चन्नी यांना मुख्यमंत्रीपद दिल्यानंतर महिला आयोगाचा आरोप

नवी दिल्ली : काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांनी नुकताच पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्विकारला आहे. परंतु चरणजीत सिंग चन्नी यांनी पदभार स्विकारताच पंजाबमध्ये एका नव्या वादाला सुरुवात झाली आहे. चन्नी यांनी महिलेची छेड काढल्याचं एक जुनं प्रकरण पुन्हा नव्याने चर्चेत आलं आहे. या प्रकरणामुळे चरणजीत सिंग मुख्यमंत्रिपदाच्या लायक नसल्यानं त्यांना काढून टाकावं, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केली आहे.

चन्नी यांनी महिलेची छेड काढल्याप्रकरणी माध्यमांशी बोलताना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा म्हणाल्या की, मी टू चळवळ चालू असताना २०१८ साली चन्नी यांच्यावर देखील एका महिलेची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांच्या विरोधात मोर्चे, आंदोलनं केली. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही.

charanjeetsing-channi

त्यावेळी त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली गेली नाही. आज काँग्रेस पक्षाचे नेतृत्व एक महिला करत आहे. परंतु तरी देखील चन्नी यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं आहे. हा आमचा विश्वासघात आहे. ते मुख्यमंत्रिपदाच्या लायक नाहीत, असं रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणी आपण स्वत: सोनिया गांधी यांच्याकडे चन्नी यांना पदावरुन हटविण्याची मागणी करणार असल्याचं देखील रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या या मागणीनंतर सोनिया गांधी कोणतं पाऊल उचलणार, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here