कर्जत (प्रतिनिधी जयेश जाधव) : ग्रामीण भागातील अशिक्षित अकुशल तरुणांना पहल ही संस्था ओळख देण्याचे कार्य करीत असून, अशा संस्थांची ठिकठिकाणी कार्यालये व्हायला हवीत. ग्रामीण भागातील तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अशा संस्थांना उत्तेजन देऊन ग्रामीण भागाच्या विकासासाठी झटायला हवे,यासाठी राज्य सरकारही कटिबध्द आहे, असे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आज खालापूर येथे केले.
खालापूर येथील स्कील ट्रेनिंग सेंटर च्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी आमदार महेंद्र थोरवे, सभापती श्रीमती पाटील, खालापूर मुख्याधिकारी श्रीमती राठोड, माथेरानच्या मुख्याधिकारी श्रीमती सुरेखा भणगे, तहसिलदार आयुब तांबोळी, पहल स्किल डेव्हलपमेंट संस्थेचे पदाधिकारी, उद्योजक भरत भाई शहा व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गावकर्यांनी दिवसातले काही तास त्या गावातल्या मुलांना ट्रेनिंग व कौशल्य देण्यासाठी या केंद्राचा वापर करायला द्यावा. स्वतंत्र विकास केंद्र आपल्या गावात तयार होण्यासाठी शाळा दिवसा वर्ग घेतात परंतु संध्याकाळी आपल्याला अशा प्रकारचे अभ्यास वर्ग शाळांमध्ये घेता यावेत, याची सांगड घातली गेली पाहिजे. कौशल्य , माहिती ,ज्ञान , संपादन करून स्वतःच्या पायावर उभे राहतील एवढी सक्षम होतील आणि आपल्याबरोबर अनेकांना बरोबर घेऊन त्यांनाही मोठं करतील याची मला खात्री आहे आणि म्हणून अशा धडपडणाऱ्या मुलांच्या मागे मजबूत करणारी संस्था या मुलांना ओळख मिळवून देण्याचे पहल संस्थेने काम हातात घेतले त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.अशा प्रकारच्या वाटचालीचा आनंदच नव्हे तर अभिमानही वाटेल, असेही ते म्हणाले.
आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर तालुका औद्योगिक क्षेत्र असल्याने अशा प्रकारच्या संस्थांनी ग्रामीण भागातील तरुणांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले असल्याने त्या तालुक्याचा रोजगाराचा प्रश्न मिटेल, आमदार म्हणून मी त्यासाठी सदैव पाठीशी राहीन,असे सांगितले. यावेळी ग्रामीण भागातील युवा व युवतींनी पहल संस्थेने जे प्रशिक्षण दिले त्याबद्दल मनोगत व्यक्त केले.






