बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रेंनी दिला भाजपला थेट सीमोल्लंघनाचा इशारा

महापालिका निवडणुकांच्या तोंडावर रंगला भाजपातील कलगीतुरा

नवी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : आगामी काळात महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक आणि बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे या दोघांमधील वाद पुन्हा एकदा उफाळला आहे. गणेश नाईक मतदारसंघातील कामे करत नसल्याने, आता मला सीमोल्लंघन करावेच लागेल, अशा थेट इशाराच आता मंदा म्हात्रे यांनी भाजपला दिला आहे.

भाजपच्या बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत स्वपक्षीय गणेश नाईक यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नवी मुंबईतील दोन्ही भाजपा आमदारांमधील विस्तव गेल्या काही वर्षापासून जाता जाईना झाला आहे. गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळीही मंदा म्हात्रे यांनी जोरदार विरोध केला होता. यानंतर या दोघांच्या वादाला पुन्हा सुरुवात झाली असून, ती धुसफूस पुन्हा एकदा टोक गाठताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे.

राजकारणात स्वपक्षीय नेत्यांकडूनच महिलांचा योग्य सन्मान होत नसल्याचा गंभीर आरोप भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केला. लोकमतच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिलांना प्रचंड संघर्ष करावा लागतो. पहिल्या वेळी निवडून आले तेव्हा मोदींची लाट होती म्हटले गेले. दुसऱ्यांदाही निवडून आले. आता तर मोदींची लाट नव्हती ना? ते माझे काम होते, माझे कर्तृत्त्व होते. पण महिलांनी केलेले काम झाकून टाकायचे, त्यांच्या बातम्या येऊ द्यायच्या नाहीत, असे प्रकार होतात. मी कोणालाही घाबरत नाही. मला कोणाला घाबरायची गरज नाही. मी नेहमी स्पष्टच बोलते. मला तिकीट द्या किंवा नका देऊ. मी लढणार म्हणजे लढणार. राजकारणात महिलांना यश मिळू लागल्यानंतर स्वपक्षातील नेत्यांकडूनच महिला नेत्यानेच पंख छाटले जातात. मात्र, आपण कधीही स्वतःला कमी समजू नये, असे मंदा म्हात्रे यांनी म्हटले होते.

ऐरोली विधानसभेत आमदार असलेले गणेश नाईक हे त्यांच्या मतदारसंघांमध्ये काम करत नाहीत. त्यामुळे मला आता सीमोल्लंघन करुन नाईकांच्या मतदारसंघात जावे लागणार आणि सर्वसामान्यांची कामे करावी लागणार, अशी खोचक टीका मंदा म्हात्रे यांनी केली. ऐरोली विधानसभेत जाऊन आगरी-कोळी लोकांसाठी खाडीकिनारी जेट्टी उभारणार असून, इतरही काम हाती घेतल्याचे यावेळी मंदाताई म्हात्रे यांनी जाहीर केले.

दरम्यान, या सगळ्यावर गणेश नाईक काय उत्तर देतात आणि मंदा म्हात्रे खरोखरच ऐरोली मतदारसंघात जाऊन काम करणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. याच सगळ्या वादाचा आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काय परिणाम होणार याबाबत कार्यकर्ते व समर्थकांमध्ये चर्चा रंगली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here