- मुंबई, ठाण्यात पावसाने दाणादाण
- पाण्यात अडकलेल्या लोकल मधून 290 प्रवाशांची सुटका
- पावसात अडकलेल्यांसाठी तात्पुरती व्यवस्था
मुंबई (संजय सावंत) – पोलीस आणि प्रशासन यांनी कोरोना काळात केलेले कार्य आदर्शवत आहे. मात्र देशाची राजधानी मुंबईवर आता कोरोनासोबतच अतिवृष्टीचे संकट कोसळले आहे. अवघ्या दोन दिवसापूर्वी सख्या भाऊपेक्षा जवळचे असणारे मोठे भाऊ गमावणाऱ्या मुंबईच्या महापौर सौ.किशोरीताई पेडणेकर या आपले दुःख बाजूला सारुन लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. त्याच्यासोबतच मुंबई पोलीसदेखील तत्परतेने लोकांची मदत करत आहे. किशोरीताईंनी आपल्या कार्यातून लोकप्रतिनिधी कसा असावा, याचा एक आदर्शच इतरांपुढे घालून ठेवला आहे.
दरम्यान मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसर्या दिवशी मुसळधार पाऊस सुरुच आहे. याशिवाय ठाणे, पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी सुरु असलेल्या मध्य आणि पश्चिम रेल्वेची उपनगरीय लोकल सेवेसह रस्ते वाहतूकीला याचा फटका बसला. हवामान खात्याने गुरूवारी पुन्हा अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने मुंबईवर अतिवृष्टीचे ढग आहेत.
मुंबईत वादळी वार्यासह पाऊस कोसळत असून अनेक भाग जलमय झाले आहेत. त्यासोबत ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांतील काही भागांत येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई आणि उपनगरांना अतिवृष्टीचा धोका असल्याचा स्पष्ट उल्लेख हवामान विभागाने केला आहे. त्याचवेळी वार्याचा वेग ताशी 106 किमी असेल असेही सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा सावध झाल्या आहेत.
ठाणे शहरात बुधवारी सायंकाळी 7.30 वाजेपर्यंत 123 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाणे शहरात 15 ठिकाणी झाडे तर 5 ठिकाणी फांद्या पडल्याने नुकसान झाले. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईत गुरूवारी पुन्हा अतिवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. याशिवाय शुक्रवारीही मुंबईत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मध्य रेल्वे मार्गांवर मस्जिद बंदर आणि सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन दरम्यान अडकलेल्या दोन लोकलमधील सुमारे 230 ते 250 प्रवाशाची आरपीएफच्या जवानांनी सुखरूप सुटका केली.त्यासाठी जवळपास दोन तांस अधिक शर्थीचे प्रयत्न करावे लागले.मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते ठाणे आणि वाशी दरम्यानची वाहतुक दुपारी 3 वाजल्यानंतर बंद झाली. पश्चिम रेल्वेची वाहतुक देखील सकाळच्या वेळेत वाहतूक खोळंबली.
मुंबईत सलग दोन दिवस सुरू असलेला जोरदार पाऊस गुरूवारीही कायम राहील, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबई महापालिका आयुक्तांनी पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा आणि एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होत आहे, तिथे तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी एमएमआरडीएच्या अधिकार्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही, हे पाहण्यास सांगितले आहे.
मुंबईत मंगळवारी सकाळी 8.30 ते बुधवारी सकाळी 8.30 या वेळेत कुलाबा वेधशाळेने 53.2 मिमी आणि सांताक्रुझ वेधशाळेने 84.3 मिमी पावसाची नोंद केली होती. मात्र बुधवारी सकाळनंतर जोर धरलेल्या पावसाने सायंकाळपर्यंत मुसळधार रूप धारण केले होते. सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या 9 तासांत कुलाबा वेधशाळेने तब्बल 229.6 मिमी, तर सांताक्रुझ वेधशाळेने 65.8 मिमी पावसाची नोंद केली आहे. मुंबई महापालिकेच्या स्वयंचलित पर्जन्यमान केंद्रांवर सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरात 170.6 मिमी, पूर्व उपनगरात 59.34 मिमी, पश्चिम उपनगरात 56.03 मिमी पावसाची नोंद झाली.
मुंबईतील अतिवृष्टीमुळे दुपारनंतर लोकल सेवा व रस्ते वाहतूक कोलमडून पडली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांसह अन्य ठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांसाठी महापालिका प्रशासनाने तात्पुरत्या स्वरुपात थांबण्याची व्यवस्था रेल्वे स्थानकानजीकच्या मनपा शाळांमध्ये केली होती. याबाबतची माहिती प्रवाशांना मिळावी म्हणून रेल्वे स्थानकांवरील स्टेशन मास्तर यांना देण्यात आली होती.







