ऑटो चालकाला लागली १२ कोटींची लॉटरी

तिरुअनंतपूरम (केरळ) : एखाद्याचे नशीब केव्हा फळफळेल हे सांगता येत नाही. असाच एक उपरवाला जब भी देता देता छप्परभाड के या गाण्याचा अनुभव येथील एका ऑटोचालकाला आला आहे. केरळ लॉटरीच्या तिरुवोनम बंपर लॉटरी निकालाचा निकाल रविवारी गोरकी भवन, तिरुअनंतपुरम येथे लागला.

केरळ राज्य लॉटरी संचालनालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार राज्याचे अर्थमंत्री के.एन. बालागोपाल यांनी सोडतीचे उद्घाटन केले. राज्याचे परिवहन मंत्री अँटनी राजू अध्यक्षस्थानी होते. या दरम्यान ओणम बंपर लॉटरीचा निकाल राज्यभरात विकल्या गेलेल्या ५४ लाख तिकिटांसाठी जाहीर झाला.ओणम बंपर लॉटरीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एक दिवसानंतर विजेत्याची ओळख ऑटो चालक म्हणून झाली आहे. लॉटरी जिंकल्यानंतर ऑटो चालकाच्या आनंदाला सीमा नव्हती.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १२ कोटींची लॉटरी जिंकणाऱ्या ऑटो चालकाचे नाव जयपालन पी आर आहे. जयपालन पी आर यांनी फॅन्सी लॉटरीच्या तिकिटांद्वारे इतकी मोठी रक्कम जिंकली आहे. जयपालन पी आर हे मूळचे कोचीजवळील मराडूतील रहिवाशी आहेत. ओणम नंतर दुसऱ्या दिवशी लॉटरीचा निकाल जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात आले, ज्यात जयपालन पी आर यांनी लॉटरी जिंकली.

रविवारी जाहीर झालेल्या निकालाच्या विजेत्याचा लॉटरी तिकीट क्रमांक टीई ६४५४६५ आहे. लॉटरी जिंकल्यानंतर जयपालन पी आर यांनी पत्रकारांना सांगितले, “मी १० सप्टेंबर रोजी त्रिपुनीथुरा येथून हे लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. मला समजले की हा एक फॅन्सी नंबर आहे.” रिपोर्टनुसार, ऑटो चालक जयपालन पी आर यांना १२ कोटींच्या लॉटरीमधून कर भरल्यानंतर ७ कोटी रुपये मिळतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here