किरीट सोमय्यांनी केली पुन्हा कोल्हापूर दौऱ्याची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करत भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर दौऱ्यावर जाण्याचा निर्धार केला होता. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने येऊन संघर्ष भडकण्याची शक्यता लक्षात घेत सोमय्या यांच्या या दौऱ्याला मनाई करण्यात आली. हा मनाई आदेश धुडकावून कोल्हापूरकडे निघालेल्या सोमय्या यांना कराड येथे रोखण्यात आले व त्यांची मुंबईला परत पाठवणी करण्यात आली. या घडामोडींनंतर काहीसं वातावरण निवळलेलं असतानाच सोमय्या यांनी नव्याने कोल्हापूर दौऱ्याची घोषणा केली आहे.

किरीट सोमय्या हे पुढील आठवड्यात मंगळवारी (२८ सप्टेंबर ) किंवा बुधवारी ( २९ सप्टेंबर ) कोल्हापुरात येणार आहेत. याबाबत त्यांनीच मुंबईत माध्यमांना माहिती दिली आहे. मी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर येथे जाणार आहे. तसे पत्र मी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहे, असे सोमय्या यांनी नमूद केले. त्यामुळे सोमय्या कोल्हापुरात आल्यास पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

याआधी २० सप्टेंबर रोजी सोमय्या हे कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते. मात्र त्यांना कराड येथूनच माघारी पाठवण्यात आले होते. यादरम्यान, आधी मुंबईत आणि नंतर कराड येथे हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. सोमय्या यांना आधी मुंबईतील मुलुंड येथील निवासस्थानी स्थानबद्ध करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथेही पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. महालक्ष्मी एक्स्प्रेसने ते कोल्हापूरकडे निघाले असता कराड येथेच त्यांना रोखण्यात आले. तिथे पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ते माघारी परतले. त्यामुळे सोमय्या यांच्या पुढील दौऱ्यातही मोठा ड्रामा पाहायला मिळू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here