‘लाल सलाम संघटने’च्या नावाने वृद्ध डॉक्टरकडे ५० लाखांच्या खंडणीची मागणी, दोघांना अटक

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : देशात घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी पकडल्यानंतर सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच फायदा उचलत खंडणी उकळण्याचा कट तिघांना रचला होता. यासाठी त्यांनी एका वृद्ध डॉक्टरला टार्गेट करीत त्यांना ‘लाल सलाम संघटने’च्या नावाने ५० लाखांची खंडणी मागितली होती. पण गुन्हे शाखेच्या युनिट-१२ च्या पथकाने तात्काळ तपास करीत अवघ्या ३६ तासांच्या आत आरोपींना जेरबंद केले आहे.

 

गोरेगावच्या पांडुरंगवाडीत वाडीलाल शहा (७६) यांचे क्लिनिक आहे. १५ सप्टेंबरच्या दुपारी तीनच्या सुमारास एक बुरखाधारी महिला क्लिनिकजवळ आली. क्लिनिकच्या शेजारीच असलेल्या केमिस्टमध्ये शहा यांच्या भाच्याकडे त्या महिलेने एक बंद लिफाफा दिला आणि काहीही न बोलता निघून गेली. त्यानंतर सायंकाळी तो बंद लिफाफा भाच्याने डॉक्टर शहा यांना दिला. रात्री घरी गेल्यानंतर कुटुंबीयांसमोर शहा यांनी तो लिफाफा उघडला असता त्यात ‘लाल सलाम संघटने’च्या लेटरहेडवर एस. के. मादोरे नावाचे हस्तलिखित पत्राद्वारे ५० लाखांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्यास शहा आणि त्यांच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिली होती. हे धमकीचे पत्र वाचून डॉक्टर शहा यांनी वनराई पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर युनिट-१२ चे प्रभारी निरीक्षक महेश तावडे यांच्या नेतृत्वाखाली विलास भोसले, सचिन गवस, अतुल डहाके, एपीआय कानवडे, रासकर, शेळके, पारकर, बागवे, सावंत, स्वप्नाली मोरे, सुनीता भेकरे यांच्या पथकाने तपास केला.

 

मालाडच्या स्कॉटर्स कॉलनीत राहणारा हयात साहा हा गुह्याचा मास्टरमाइंड आहे. वाडीलाल शहा हे हयातचे फॅमिली डॉक्टर आहेत. त्यामुळे डॉक्टर शहा यांची आर्थिक बाजू मजबूत असल्याचे साहाला माहिती होते. त्यामुळे सोशल मीडियावरून आयडिया घेत हयात साहा याने डॉक्टरांकडून पैसे उकळण्याचा डाव रचला. यासाठी त्याने ओळखीच्या किरणला हाताशी घेतले. मग दोघांनी मिळून भाईशाकी हिला केमिस्टमध्ये जाऊन बंद लिफाफा देण्याचे काम सांगितले होते. हयात याने सद्य परिस्थितीचा गैरफायदा उचलण्याचा प्लॅन केला होता.

 

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक बाबींचा बारकाईने अभ्यास केल्यावर बंद लिफाफा देणारी बुरखाधारी महिला घणसोली येथे राहणारी भाईशाकी बिस्वाव ही असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तिला पकडले. तिच्या चौकशीत विरार येथे राहणाऱया विक्रांत किरत याचे नाव समोर आले. त्याला पकडून चौकशी केल्यावर मालाड येथे राहणाऱया मोहम्मद हयात साहा याने हा कट रचल्याचे समोर आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here