मुंबई (जॉनी वाझ) – लॉकडाऊन काळात सिनेमा-सीरियल्सचे शूटिंग बंद होते. त्यामुळे प्रेक्षकांना रिपीट मालिका पाहाव्या लागत होत्या. दरम्यान देशभरात आता अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मालिकांचे शूटिंग पुन्हा सुरू झाले आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ देखील लॉकडाऊननंतर सुरू करण्यात आली आहे. नवीन एपिसोड्स सुरू झाल्यानंतर प्रेक्षकवर्गात आनंदाचे वातावरण आहे. ही मालिका केवळ टेलिव्हिजन जगतातच नाही तर सोशल मीडियावर देखील चर्चेत असते. यातील कलाकारांनी प्रत्येकाची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. हा कार्यक्रम टीआरपीच्या रेसमध्ये देखील अव्वल स्थानावर आहे. दरम्यान हा शो सुरू झाल्याच्या आनंदात असणाऱ्या प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. यातील दयाबेन अर्थात दिशा वकानी मालिकेमध्ये पुन्हा परतण्याची शक्यता आहे.
दीर्घ काळापासून दिशा या मालिकेमध्ये दिसली नाही आहे. याआधी देखील या मालिकेत काम करणाऱ्या जेनिफरने असे संकेत दिले होते की लवकरच दिशा या मालिकेत परतू शकते. तिने अशी माहिती दिली होती की, सध्या दिशाची प्राथमिकता तिची मुलगी आहे त्यामुळे मालिकेसाठी तिच्यावर दबाव टाकणे चुकीचे होईल. गेल्या 2 वर्षांपासून दिशाबाबत सस्पेन्स कायम आहे. दयाबेनला रिप्लेस केले जाईल अशा चर्चा देखील काही काळासाठी होत होत्या. दरम्यान चाहत्यांची पसंती मात्र त्यांच्या आवडत्या दिशा वकानीलाच आहे.







