ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : शहरातील निजामपूर पोलीस ठाण्यांतर्गत कोंबडपाडा परिसरात सोनसाखळी चोराला पकडून नागरिकांकडून बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर गुरुवारी मोठ्या प्रमाणात फिरत होता. याप्रकरणी सोनसाखळी चोरटा सलमान पठाण (वय ३० वर्षे) याच्यावर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोंबडपाडा परिसरात बुधवारी सायंकाळी एक महिला गणपती मंदिराशेजाराहून जात असताना दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोरट्याने तिच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र खेचून पळ काढला, यावेळी महिलेने केलेल्या आरडाओरड्यामुळे स्थानिकांनी चोरट्याचा पाठलाग केला असता तो वंजारपट्टीच्या दिशेने पळून जात असताना चोरटा दुचाकीवरून पडल्याने नागरिकांच्या तावडीत सापडला.
या चोरट्याला पकडून झडती घेतली असता त्याच्याजवळ महिलेचे मंगळसूत्र आढळल्याने संतप्त नागरिकांनी त्याला पकडून पुन्हा कोंबडपाडा परिसरात आणून बेदम मारहाण केली. या मारहाणीत चोरटा गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात रवाना केले आहे.






