ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांना चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. पुण्यातील मावळ भागात स्थानिक गुन्हे शाखेकडून टोळीतील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पुणे दृतगती महामार्गावर वाहन चालकांना लुटल्याच्या घटना अनेक वेळा समोर येत असतात.
खालापूर येथील एक टोळी चोरीचे गुन्हे करत असल्याची खात्रीशीर माहिती गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एलसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर खालापूर तालुक्यातील मोरबेवाडी चौक येथे सापळा लावत क्राईम ब्रांचच्या पथकाने गणेश हरिभाऊ वाघमारे आणि संतोष उर्फ मंगल्या वाघमारे या दोघांना ताब्यात घेतले.
आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी, गंभीर दुखापतीसह मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक चालकांना थांबवून चाकूचा धाक दाखवत ते जबरी चोरी करत असल्याचा आरोप आहे.






