ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : मुंबई-नाशिक हायवेवर हॉटेलबाहेर थांबलेल्या ट्रकच्या चालकाची निर्घृण हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील खर्डी येथील हॉटेल सहाराजवळ मध्यरात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास ही हत्या झाली असावी, असा अंदाज आहे.
राजेंद्र भगवान कदम (रा. बानगाव, ता. नांदगाव, जि. नाशिक) असं हत्या झालेल्या ३३ वर्षीय ट्रक चालकाचे नाव आहे. मुंबई – नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील खर्डी येथील हॉटेल सहारावर हत्येची घटना घडली आहे.
हॉटेलमध्ये रात्री जेवण करण्यासाठी ट्रक ड्रायव्हर राजेंद्र कदम थांबला होता. जेवण झाल्यानंतर रात्री २ वाजेच्या सुमारास एमएच ०४ एफडी ४६८१ या आपल्या ट्रकने जात असताना अज्ञात व्यक्तीने तरुणावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. दरम्यान, ट्रक चालकाच्या हत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत शहापूर पोलिस अधिक तपास करत आहेत.






