ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : डोंबिवली पूर्व येथील १५ वर्षांच्या मुलीवर तब्बल ८ महिने सामूहिक अत्याचार करणार्या ३३ नराधमांचे समोर आलेले कारनामे ऐकून पोलिसांनाही धक्का बसला आहे. गेल्या ९ महिन्यांपासून पीडिता ‘नरक यातना’ भोगत असलेल्या याप्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत.
पीडितेवर अत्याचार करताना तिला गर्भधारणा राहू नये यासाठी आरोपींनी कंडोमऐवजी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याची धक्कादायक बाब तपासात स्पष्ट झाली आहे. तसेच आरोपींनी पीडित मुलीला ब्लॅकमेल करण्यासाठी एक ‘फ्रेंड्स’ नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. अन् या ग्रुप वरून नराधमांनी तिला वाट्टेल तेव्हा घराबाहेर पडण्यास भाग पाडले. या प्रकरणातील सर्व आरोपी हे २१ वर्षांआतील असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत तब्बल २८ जणांना अटक केली असून एकूण आरोपींची संख्या ही ३३ वर पोहचली आहे.यातील काही आरोपी हे राजकीय पदाधिकाऱ्यांचे नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.
बलात्काराच्या यातना भोगणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या मानलेल्या भावाने तिची ओळख डिसेंबर २०२० आरोपीच्या मित्राशी करून दिली होती. संबंधित मित्राने तिची ओळख मुख्य आरोपी विजय फुकेशी करून दिली होती. २९ जानेवारीला सकाळी विजयने तिला चेरा मंदिरा मागील मैदानात बोलावले. तेथे मित्राची खोली दाखविण्याच्या बहाण्याने पीडितेला रिक्षात बसवले. त्यावेळी रिक्षात तिघे बसले. त्यांनी तिला नांदिवली टेकडीवरील एका मुलाच्या खोलीवर नेले. विजयने मोबाईलमध्ये पीडितेचे अश्लील फोटो दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्या वेळी अन्य एकाने व्हिडीओ तयार केला. त्यानंतर तिघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर मुलीवर अत्याचाराचं सत्र सुरू झाल्याचं पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. आरोपींनी कधी गुंगीचं औषध तर कधी दारू पाजून पीडितेला नरक यातना दिल्या आहेत.
या घटनेनंतरही विजय तिला वारंवार फोन करीत होता. मात्र, पीडितेने त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर काही दिवसांनी पीडितेने तिच्या मोबाईलमधील सर्व मुलांचे नंबर ‘डिलिट’ केले. १५ फेब्रुवारी रोजी सांगाव परिसरातच दुसऱ्या ठिकाणी पीडितेचे कुटुंब राहण्यास आले. २० फेब्रुवारी रोजी पुन्हा विजयचा तिला फोन आला. त्यावेळी फोनमध्ये नंबर सेव्ह नसल्याने तिने तो उचलला. त्याने तिला भेटायला बोलावले, पण मुलीने नकार दिला. २१ फेब्रुवारीला विजय तिच्या घराजवळ आला आणि त्याने तिला ‘भेटायला आली नाही तर तिच्या कुटुंबीयांना व्हिडीओ दाखविण्याची धमकी दिली. यावर पीडितेने त्याला भेटण्याची तयारी दर्शवली.
विजयने तिला देसलेपाडा येथील एका मुलाच्या घरी नेले. तेथे तिला शीतपेयात नशा येणारी भुकटी मिसळून ते पिण्यास दिले. पण ते घेण्यास नकार दिला. या वेळी खोलीत सात जण उपस्थित होते. बळजबरीने तिला शीतपेय पिण्यास दिल्यानंतर तिला गुंगी आली आणि त्यानंतर तिच्यासोबत काय झाले, हे तिने आठवत नसल्याचे सांगितले. ती शुद्धीवर आल्यावर तिला एका मुलाने घराजवळ नेऊन सोडले. त्यानंतरही तिला भेटण्यासाठी काही फोन करीत होते; परंतु प्रकृतीचे कारण पुढे करून तिने भेटण्यास वारंवार नकार दिला. २२ मार्च रोजी सायंकाळी व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी देत पीडितेला नवनीत नगर येथील एका घरात बोलावून घेतले. त्यावेळी खोलीत १५ जण आधीच हजर होते. आधी घडले त्याप्रमाणेच मुलांनी तिला शीतपेयातून गुंगीचे द्रव्य देऊन तिच्यावर अत्याचार केले.
त्यानंतर ५ मे रोजी तिच्यावर सहा जणांनी अत्याचार केला. त्याच दिवशी ६.३० वाजता देसलेपाडा येथे चौघांनी आणि त्यानंतर रात्री १०.३० ला वडवली येथे तिच्यावर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला घराजवळ सोडून देण्यात आले. पहाटेपर्यंत मुलगी घरी न आल्याने पीडितेच्या आईने मानपाडा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. मात्र, मारण्याची धमकी दिल्याने मुलीने त्याविषयी अधिक काही न करण्याविषयी कुटुंबीयांना सांगितले.
१६ मे रोजी तिच्यावर नवी मुंबईत नेऊन एकाने बलात्कार केला. त्यानंतर तिला मद्य पाजून आठ जणांनी तिच्यावर अत्याचार केले. पीडितेची प्रकृती बिघडल्याने तिला कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर २८ जुलैला तिच्यावर दोघांनी मुरबाडजवळ अज्ञात स्थळी अत्याचार केले. २२ सप्टेंबर रोजी कोळेगाव येथे रिक्षात बसवून तिच्यावर आठ जणांनी अत्याचार केले. या घटनेनंतर ती आजारी पडल्याने तिने हा सारा प्रकार घरच्यांना सांगितला असता कुटुंबीयांनी २२ सप्टेंबरला रात्री मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.






