ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : जिल्ह्यातील भिवंडी येथून महिलेवरील अत्याचाराची घटना समोर आली आहे. दारू पिण्यासाठी पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या पतीने तिला पेटवून मारण्याचा प्रयत्न केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिरोज याने आपल्या पत्नीकडे दारू खरेदीसाठी पैसे मागितले. यावेळी पत्नीने त्याला पैसे देण्यास नकार दिला. यानंतर संतापलेल्या फिरोज याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतले आणि तिला पेटवून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी रुकसाना हिने तात्काळ आग विझवत घटनास्थळावरुन पळ काढला. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस अधिकारी जयमाला वसावे यांनी सांगितले की, भिवंडीतील शांतीनगर परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनाप्रकरणी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फिरोज याच्या विरोधात पोलिसांनी कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.






