औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : जिल्ह्यातील चिकलठाणा येथील रहिवासी असणाऱ्या शेख जुनैद ऊर्फ बंबय्या शेख जुबेर (वय २१) या युवकाला पोलिसांनी ऐन साखरपुड्याच्या दिवशी अटक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अवघ्या सहा तासांपूर्वी केलेल्या गुन्ह्यांत पोलिसांनी ही कारवाई करत आरोपीला तुरुंगवारी घडवली आहे. साखरपुड्याच्या दिवशी भावी नवरदेवाला तुरुंगवारी घडल्याने दोन्ही कुटुंबीयांवर नामुष्की ओढावली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून घटनेचा तपास केला जात आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, जुनैदने शुक्रवारी पहाटे सातारा परिसरातून एक दुचाकी गाडी चोरली होती. आरोपीनं २४ सप्टेंबर रोजी पहाटे विटखेडा येथील रहिवासी असणारे अनिल जाधव यांची हिरो होंडा डीओ ही दुचाकी चोरली होती. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, आरोपीने पहाटे पाच वाजता घटनास्थळी येऊन स्वत:ची गाडी घटनास्थळी सोडून जाधव यांची दुचाकी चोरून नेताना आढळला. दरम्यान काही स्थानिक नागरिकांनी आरोपीला हटकलं असता, आरोपीनं संबंधित गाडी आपली असल्याचं सांगत घटनास्थळावरून पोबारा केला होता.
दरम्यान, दुचाकीचे मालक अनिल जाधव यांनी दुपारी याप्रकरणाची फिर्याद पोलिसांना दिली. चोरीच्या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागताच, पोलिसांनी अवघ्या सहा तासांत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे, आरोपी जुनैदच्या आई वडिलांनी दोनच दिवसांपूर्वी त्याचं लग्न ठरवलं होतं. तसेच घरात साखरपुड्याची तयारी सुरू होती. अशात पोलिसांनी त्याला राहत्या घरातून अटक केली आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर नामुष्की ओढावली.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असताना, आरोपीने अवघ्या काही तासात चोरीच्या गाडीचा कायापालट केल्याचं निदर्शनास आलं आहे. आरोपीने 2 हजार रुपये खर्च करत गाडीवर लाल रंगाचं रेडीयम लावून घेतलं होतं. तसेच गाडीच्या पुढच्या भागावर ‘३०२’ हे हत्येचं कलम टाकलं होतं. आरोपी जुनैद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मारहाण आणि दुचाकी चोरीचे सहापेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.






