औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्यावर मागील काही महिन्यांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासुन महेबुब शेख या प्रकरणामुळं अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणाची औरंगाबादच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज न्यायालयाने सुनावणी दरम्यान महेबुब शेख यांच्याविरोधात तपास अधिकाऱ्यांनी सादर केलेला बी समरी अहवाल रद्द केला असुन पुढील तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
महेबुब शेख यांच्यावर औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज न्यायालयात तपास अधिकाऱ्यांनी बी समरी अहवाल न्यायालयात सादर करत महेबुब शेख यांच्यावरील आरोप खोटे आहेत, तसेच ज्या ठिकाणी गुन्हा घडला आहे, त्या ठिकाणी महेबुब शेख उपस्थित नव्हते तर, अन्य ठिकाणी होते, असं बी समरी अहवालात नमूद केलं होतं.
पीडितेचे वकील मणियार यांनी बी समरी अहवालास विरोध करत म्हणाले की, आरोपी शेख हे मोठे राजकारणी असुन त्यांचा पोलिसांच्या तपासावर प्रभाव पडला आहे. तपासा दरम्यान, शेख यांना अटक किंवा ताब्यात घेतलेलं नव्हतं. तसेच पोलिसांनी पीडितेच्या घरी वारंवार भेट दिल्याने, पीडितेला त्रास झाल्याचं मणियार यांनी न्यायालयात सांगितलं आहे.
दरम्यान, आज या प्रकरणावर सुनावणी करत असताना सादर केलेला बी समरी अहवाल रद्द केला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनीही या प्रकरणावर देखरेखीसाठीचेही आदेश न्यायदंडाधिकारी सचिन न्याहारकर यांनी दिले आहेत.






