महाबळेश्वरच्या अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ आक्रमक

सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून, या मुलीने बाळाला घरात जन्म दिल्यानंतर तिच्यावर झालेल्या सामुहिक अत्याचाराला वाचा फुटली आहे. संबंधित बाळास बेकायदेशीररित्या दत्तक देण्याच्या प्रक्रियेत सहभागी असलेल्या नऊ जणांवर संशयित म्हणून समावेश करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेना स्थानिक नेत्याच्या दोन मुलांसह एकूण ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, महाबळेश्वरला अल्पवयीन मुलीवर गॅंगरेप झाला. त्यातून बाळ झाले. ते विकले. त्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तेथील एका शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मुलास अटक केली आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करीत आहेत. अरे काय अजून तपास सुरु आहे. ही शिवशाही आहे का असा प्रश्न वाघ यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी महाबळेश्वरातील घटनेचा तपास योग्य दिशेने सुरु असल्याचे सांगितले. ते म्हणाले, या प्रकरणात संबंधित आरोपी कोणत्या पक्षाचे आहेत हे बघायचे कोणतेही काम पोलिसांचे नाही. पोलिसांनी संशयितांवर पोक्सो अंतर्गत कारवाई केली आहे. त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा होईल, अशा पद्धतीने गृह विभाग काम करत आहे.

या प्रकरणात सनी उर्फ सत्वित दत्तात्रय बावळेकर आणि योगेश दत्तात्रय बावळेकर यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही मुख्य संशयितांना २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी महाबळेश्वर पोलिसांचे पथक मुंबईस रवाना झाले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here