नाशिक (विशेष प्रतिनिधी) : येथील नवीन नाशिक भागातील बंदावणे नगर परिसरातील न्यू सद्गुरू ज्वेलर्स या सराफा दुकानातून आज शुक्रवारी (दि.२४ सप्टेंबर) भरदिवसा १५ तोळे सोने आणि ६ हजार रुपयांची भरदिवसा चोरी झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. खबर मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून, त्यांनी तपास सुरू केला आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सद्गुरु अलंकारचे मालक प्रमोद विभांडीक यांनी सकाळी दुकान उघडले. त्यांना दुकानाजवळ पडलेली घाण साफ करायची होती. त्यासाठी पाणी आणण्यासाठी ते दुकानातील मागीच्या बाजूला गेले. त्यांनी किराणा दुकानदाराला दुकानावर लक्ष ठेवायला सांगितेल. त्यानंतर या किराणा दुकानात दोन तरुण आले. त्यांनी दुकानदाराची दिशाभूल केली. एक जण सराफा दुकानात घुसला आणि विभांडक यांनी दुकानात ठेवलेली बॅग लंपास केली.
या बॅगमध्ये एकूण १५० ग्रॅम वजनाचे हे सोने असून त्याची किंमत ७ लाखांच्या घरात आहे. या धाडसी चोरीची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर कोल्हे यांच्यासह पोलिसांचे पथक दाखल झाले आहे. सराफा दुकानात आणि दुकानाच्या परिसरात सीसीटीव्ही लावले आहेत. त्यामुळे चोरटे या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.






