मनोरंजन अनलॉक : राज्यातील सिनेमा-नाटय़गृहे २२ ऑक्टोबरपासून उघडणार

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर राज्याची अनलॉकच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून आणि घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला होता. त्यापाठोपाठ आता राज्यातील नाटय़गृहे व चित्रपटगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेचा मुकाबला करताना मार्चच्या दुसऱया आठवडय़ात नाटय़गृहे, चित्रपटगृहे व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्याने राज्य सरकारने टप्प्याटप्याने कोरोनाच्या दुसऱया लाटेत लावलेले निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आयोजित चित्रपट क्षेत्र व रंगकर्मीच्या बैठकीत थिएटर्स उघडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे रंगकर्मी व चित्रपट-नाटय़रसिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्यातील चित्रपटगृहे आणि नाटय़गृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल. यासंदर्भात सविस्तर कार्यपद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. या बैठकीला राज्याच्या टास्क फोर्सचे सदस्य तसेच खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम पुंटे, आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, निर्माता रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, शिवसेना सचिव आदेश बांदेकर व अन्य उपस्थित होते.

मात्र यावेळी २२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱया नाटय़ व चित्रपटगृहात किती टक्के प्रेक्षकांना परवानगी देण्यात येईल याची अजून स्पष्टता केलेली नाही. यासंदर्भातील एसओपी लवकरच जाहीर करण्यात येईल. सुरुवातीच्या दिवसांमध्ये ५० टक्क्यांच्या मर्यादेसह चित्रपटगृह सुरू करण्यात येतील असा अंदाज वर्तवला जात आहे. इतर सार्वजनिक ठिकाणांप्रमाणेच चित्रपटगृह आणि नाटय़गृहांसाठीही नियमावली असेल. यात मास्क लावणं, सॅनिटायझेशन, सामाजिक अंतर यांचा समावेश असेल.

शाळांपाठोपाठ आता राज्यातील पदवी महाविद्यालयेही लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व कुलगुरूंना स्थानिक कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन किती विद्यार्थी उपस्थितीत महाविद्यालये सुरू करणे शक्य आहे याविषयीचा अहवाल येत्या आठ दिवसांत पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी येथे बोलताना उदय सामंत पुढे म्हणाले की, कुलगुरूंकडून अहवाल आल्यानंतर आरोग्य विभागाने नेमलेल्या टास्क फोर्सच्या शिफारशी लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या परवानगीनंतर प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू करण्याविषयीचा निर्णय घेतला जाईल. विद्यार्थी, पालकांनी आता महाविद्यालयाचे येण्याची तयारी करावी, असेही सामंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here