नाशिक (विशेष प्रतिनिधी) : उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणात दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केली आहे. आतिफ उर्फ कुणाल नावाच्या व्यक्तीला नाशिक रोडच्या आनंद नगर भागातून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील धर्मांतर प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील नाशिकपर्यंत पोहोचल्याचं समोर आलं आहे.
आतिफ हा कुणाल या नावाने नाशिक शहरात वास्तव्याला होता. परदेशातील वेगवेगळ्या खात्यांमधून तब्बल २० कोटी रुपये आतिफ उर्फ कुणालच्या खात्यात जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पैसे कुठून आले, याचा तपशील उपलब्ध नाही. दहशतवाद विरोधी पथक याबाबत अधिक तपास करत आहे. उत्तर प्रदेशच्या धर्मांतर प्रकरणात आतिफचा समावेश असल्याचा एटीएसला संशय आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातील धर्मांतर प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यातील इरफान शेख नावाच्या तरुणाला जून महिन्यात अटक झाली होती. मूकबधिर विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला होता. इरफान शेख हा तरुण मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातील परळीसारख्या दुर्गम तालुक्यातल्या शिरसाळा या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. या तरुणाचं शिक्षण सुद्धा शिरसाळा गावातल्या प्राथमिक शाळेत झालं. यानंतर नोकरीच्या निमित्ताने तो दिल्लीत गेला. त्या ठिकाणी तो प्रोफेसर म्हणून काम करत होता. मात्र प्रोफेसर म्हणून काम करत असताना तो धर्मांतराच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप उत्तर प्रदेश पोलिसांनी केला होता. या प्रकरणात त्याला पोलिसांकडून अटकही झाली होती.
उत्तर भारतातील कथित धर्मांतर प्रकरण गंभीर आहे. उत्तर प्रदेश मधल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जवळपास 1 हजार लोकांना धर्मांतरित करण्यात आल्याचा आरोप होतोय. नागरिकांचं धर्मांतर करत असताना वेगळी थेअरी अवलंबण्यात आल्याचीही चर्चा रंगली होती. इरफानला या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याच्यावर करण्यात आलेले आरोप त्याच्या कुटुंबाने फेटाळून लावले होते. इरफान असं असं करू शकत नाही असं त्याच्या कुटुंबाचा म्हणणं होतं.






