गुलाब चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार; चंद्रपूर जिल्ह्यासह ११ जिल्ह्यांना रेड अलर्ट

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे शनिवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. रविवारच्या रात्रीपासूनचे लँडफॉलला सुरुवात झाली होती. भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे की ‘गुलाब’ चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी ओडिशा आणि आंध्र प्रदेशचे किनारपट्टी भाग पूर्णपणे तयार आहेत. उत्तर आंध्र प्रदेश आणि लगतच्या दक्षिण ओडिशा किनारपट्टीसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दोन्ही राज्याच्या पूर्व किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी वेगवान वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर पुढील तीन तासात नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, बीड, पुणे, जालना आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यासोबतच काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आज विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आजसाठी चंद्रपूर जिल्ह्यासह ११ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी २०० मिमीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने सोमवारी म्हणजेच आज पुण्यासह नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि गडचिरोली या अकरा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. सोमवारी संबंधित जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांना सोमवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवारी राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here