पोलीस निरीक्षकांनी केले कन्यादान अन् पोलीसच झाले वऱ्हाडी

अक्कलकोट (क्राइम रिपोर्टर वैदपाशा तडमुड) : येथे एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. या लग्नात चक्क पोलीस निरीक्षकांनीच अनाथ मुलीचे कन्यादान केले अन् पोलीसच वऱ्हाडी झाल्याचे दिसून येत होते. लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या मुलीचे पोलिसांनीच कन्यादान केले. या अनोख्या विवाहाची जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

बांधकाम मजूर असणाऱ्या सचिन मंजुळकर याची त्याच गावातील बिगारी काम करणाऱ्या यलव्वा टोणगे हिच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र, मुलाच्या घरचे आंतरजातीय विवाहासाठी तयार नव्हते. मुलीच्या आई-वडिलांचे सहा वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. ती आजीसोबत राहते. आजीही वार्धक्याने घरीच असते. त्यामुळे मुलगी बिगारी काम करून उदरनिर्वाह चालविते. घरच्यांच्या विरोधामुळे मुलगा लग्नास टाळाटाळ करू लागला. त्यामुळे मुलीने थेट पोलीस ठाणे गाठले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी तक्रारीचे सविस्तर कारण जाणून घेतले.

त्यानंतर पोलिसांनी सचिन मंजुळकर याला बोलवून घेतले. त्याने लग्नास माझी संमती आहे. मात्र, आंतरजातीय लग्नास कुटुंबीयांची परवानगी नसल्याचे सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी मुलाची समजूत घातली. तसेच, त्याच्या नातेवाईकांना बोलावून त्यांचेदेखील समुपदेशन केले. त्यानंतर मुलाचे कुटुंबीयही लग्नासाठी तयार झाले. मात्र, मुलगी अनाथ असल्याचे समजल्यानंतर स्वतः पोलीस निरीक्षक यांनीच पुढाकार घेत स्वतःच्या मुलीप्रमाणे कन्यादान केले. यावेळी सर्व पोलिसांनी स्वखर्चाने पोलीस ठाण्याच्या आवारातच दोघांचे लग्न लावून दिले. तसेच संसारोपयोगी साहित्य, सोने, साडी आणि आहेरदेखील पोलिसांच्या वतीने देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here