मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : राज्यात ईडीचे सत्र सुरुच असून अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले होते. सकाळी त्यांना ईडीने समन्स पाठवले होते. सकाळी साडे आठ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले होते. त्यानंतर सकाळी चौकशीसाठी ईडीचे अधिकारीही त्यांच्या घरी दाखल झाले होते. चार तासापासून ईडीकडून चौकशी चालू असतानाच अडसूळ यांची तब्येत बिघडली आहे. त्यांच्या मुंबईतल्या घरी तातडीने अॅम्ब्युलन्स बोलविण्यात आली आहे. गोरेगावच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आले आहे.
आनंदराव अडसूळ यांच्यावर सिटी बँकेत ९०० कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचप्रकरणी आज त्यांना आणि त्यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवले होते. सकाळी ७ ते ७.३० वाजण्याच्या सुमारास ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले. त्यानंतर काही तास त्यांची चौकशी करण्यात आली. अखेर पावणे अकराच्या सुमारास त्यांना ताब्यात घेतले जाणार होते, पण त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आहे.
आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी ५ जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रे सादर करण्यासाठी ईडी कार्यालयातही ते गेले होते. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये १३-१४ शाखा आहेत. या बँकेत ९०० खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ १ हजार एवढी रक्कम मिळत आहे, असेही रवी राणा म्हणाले होते.






