औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : शहरातील गारखेडा परिसरात पेट्रोल न दिल्याच्या कारणावरून एका तरुणाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. दिनेश देशमुख असं पिडीत तरुणाचे नाव असून, भागवत सर्जेराव गायकवाड, नितीन प्रभाकर सोनवने आणि बालाजी तुकाराम गाडगीळ या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पेटवण्यात आलेल्या तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, तरुणाची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दिनेश रुस्तमराव देशमुख (वय ३१ वर्ष, रा. मोतीनगर) हा खासगी वाहनावर चालक आहे. १९ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे तो घरातून बाहेर पडला. सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्याचा मित्र किरण गाडगिडे त्याला भेटायला गेला. घराजवळील रिकाम्या प्लॉटवर गप्पा मारत दोघे दारु पिण्यास बसले.
दुपारी एक वाजताच्या सुमारास तिथे नितीन सोनवणे आणि भागवत गायकवाड आले. यावेळी नितीनने कामावर जाण्यासाठी पेट्रोल दे, अशी मागणी केली. किरणने दिनेशला पेट्रोल देण्यासाठी सांगितले. त्याने थोडेच पेट्रोल देण्याची तयारी दर्शवली, पण आणखी जास्त पेट्रोलची मागणी नितीनने केली. तेव्हा दिनेशने स्पष्ट नकार दिला. त्याचा राग आल्याने भागवतच्या इशाऱ्यावरून नितीनने काढलेले पेट्रोल दिनेशच्या अंगावर फेकले. त्या दरम्यान किरणने जवळच्या किराणा दुकानातून काडेपेटी आणली आणि काडी पेटवून दिनेशच्या अंगावर फेकली. त्या वेळी एकदम भडका उडाला आणि जळाल्याने दिनेश गंभीर जखमी झाला. हा प्रकार दिसताच स्थानिक राहिवासी व कुटुंबीयांनी धाव घेत दिनेशला खासगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिस ठाण्याच्या विशेष पथकाने भागवत सर्जेराव गायकवाड (वय २६ वर्ष), नितीन प्रभाकर सोनवने (वय २७ वर्ष), बालाजी तुकाराम गाडगीळ (वय २८ वर्ष) सर्व रा. न्यू मोतीनगर गारखेडा यांना अटक केली. ही कारवाई पुंडलिकनगरचे सहायक पोलीस निरीक्षक शेषराव खटाणे, बाळाराम चौरे, गणेश वैराळकर, राजेश यदमळ, विलास डोईफोडे, अजय कांबळे, मांटे, कल्याण निकम यांनी केली.






