मांजरा धरण १०० टक्के भरले; पाण्याचा विसर्ग सुरु : नदीलगतची शेते पाण्यात

लातूर (प्रतिनिधी) : येथील मांजरा धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून आता या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याचा फटका मांजरा नदी लगतच्या शेतांना बसत आहे. आगोदरच पावसामुळे खरीपातील सोयाबीन हे चिखलात आहे आता नदीचे पाणीच या पिकामध्ये साठत असल्याने काढणीची कामे करावी तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे मांजरा धरण हे १०० टक्के भरलेले आहे. त्यामुळे धरणातून १४९.८० घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु आहे. शिवाय नदीलगतच्या गावांना सतर्कतेची इशारा देण्यात आला आहे. पाण्याच्या विससर्गामुळे शिरुरअंतपाळ तालुक्यातील फकरानपूर, वांजरखेडा, हालकी, डोंगरगाव, उजेड बिबराळ, बाकली यांसह राणी अंकुलगा शिवारात पाणी साठल्याने पूर स्थिती निर्माण झाली आहे.

धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच धरण क्षेत्रात पावसाचा जोर हा कायम आहे. त्यामुळे धोका हा टळलेला नाही. पावसाचा फटका अगोदरच पिकांना बसलेला आहे. आता शेतामध्येच पाणी साठत असल्याने शेती कामे करावी तरी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे नुकसानीचे कोणतेही निकष लावण्यात वेळ खर्ची न करता थेट आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here