चंदीगढ़ (पंजाब) : पंजाबमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग विरूद्ध नवज्योतसिंग सिद्धू संघर्षाला नवे वळण लागताना दिसत आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती झालेल्या नवज्योतसिंग सिद्धू यानेही काँग्रेसाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
मंगळवारी सिद्धू याने पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना आपला राजीनामा पाठवला. एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य हे तडजोडीमुळे उतरणीला लागते. मी पंजाबच्या भवितव्यासाठी तडजोड करणार नाही. मी काँग्रेससाठी यापुढेही काम करत राहेन असं सिद्धू याने गांधी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करताना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
अमरिंदर सिंग मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांची वर्णी लागली होती. चरणजीत सिंग चन्नी हे काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचे खास आहेत. शनिवारी (१८ सप्टेंबर) कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर हल्लाबोल करत ते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि जनरल बाजवा यांचे जवळचे असल्याचे म्हटले होते. तसेच सिद्धू यांना मुख्यमंत्री बनवल्यास आपण विरोध करू असेही ते म्हणाले होते.






