उस्मानाबाद जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावं पाण्यात

पुरामुळे शेती गेली वाहून; बळीराजा झाला हताश

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान, तेर आणि ढोकी या दोन भागात तर अक्षरशः ढगफुटी झाली असून, नदी नाले तुडुंब वाहत असून तेरणा नदीला पूर आला आहे. त्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले असून, संसार उध्वस्त झाला आहे. तेरणा धरण फुल्ल झाले असून सर्व दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे तेर या गावासह तेरणा नदी काठी असलेल्या इर्ला दाऊतपूर येथे पाणी गावात शिरले आहे.

तेर ढोकी कळंब या भागात ढगफुटी झाली आहे. शेतात ४ ते ५ फूटपाणी असून सरकारने पंचनामे न करता थेट मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तेरणा धरण भरले असून या धरणातुन वाहणारे पाणी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत, तेरणा धरणची व आसपासच्या गावात पावसाने पाणीच पाणी झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, पावसाने मराठवाड्यात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्याची ओळख पावसाने यावर्षी जरी पुसली असली तरी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पावसामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याचबरोबर अनेकांचा संसार देखील उध्वस्त झाला आहे. दरम्यान, येत्या २ ते ३ दिवस पुन्हा पाऊस पडणार असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here