सोलापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा हाहाकार

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : शहर व जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्य़ा पावसामुळे अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. सीना नदीला पूर आल्याने दक्षिण सोलापूर व मोहोळ तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा हिप्परगा तलाव सलग दुसऱ्य़ा वर्षी पूर्णक्षमतेने भरला आहे. यामुळे आता शहरातील काही नागरी वस्त्यांना धोका निर्माण झाला आहे. सात तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला असून, शेती व पिकांचे नुकसान झाले आहे.

चार दिवसांपासून कोळसणाऱ्य़ा पावसामुळे जवळील ओढे व नाल्यातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर येत असल्याने सोलापूर शहराजवळील सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या एकरूख तथा हिप्परगा तलावात ९६ टक्क्यांहून अधिक पाण्याचा साठा झाला आहे. सलग दुसऱ्य़ा वर्षी हिप्परगा तलाव भरला असून, यामुळे शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मात्र, तलावातील पाणी सांडव्यातून सोडल्यास अवंतीनगर, पांढरेवस्ती, मडकीवस्ती, देगाव, वसंतविहार, बसवेश्वरनगर या परिसरातील अनेक नगरांना धोका होऊ शकतो. त्यामुळे पालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

यापूर्वी या परिसरात तलावातील पाणी सांडव्याद्वारे सोडल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. अशीच स्थिती सध्या उद्भवली असून, पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, एकरूख मध्यम प्रकल्पाचे शाखाधिकारी शिरीष जाधव, नगर अभियंता कारंजे यांनी तलावाला भेट देऊन पाहणी केली. बाधित होणाऱ्य़ा नगरातील लोकांना सतर्कतेचा इशाराही त्यांनी दिला आहे. गेल्या ३१ वर्षांत ४ वेळा हा तलाव भरला असून, ब्रिटिशकालीन हा तलाव आदिल ओढय़ावर १८७१ साली बांधण्यात आला आहे.

दरम्यान, सीना नदीला पूर आल्याने दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ, सिंदखेड, राजूर, संजवाड येथील बंधारे व पूल पाण्याखाली गेले असून, वाहतूक बंद झाली आहे. पुरामुळे नदीचा विसर्ग सतत वाढत असून, शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील मलिक पेठ, आष्टे, शिरापूर, लांबोटी, मुंढवाडी येथील बंधारे-पूल पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला असून, गावकरी स्थलांतरित होत आहेत. परांडा, धाराशिव, बार्शी तालुक्यातील मोठ्या पावसामुळे सीनेला पूर आला आहे. अक्कलकोट तालुक्यातही मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणही शंभर टक्के भरले असून, २४०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. मोट्याळ, सांगवी, बावकरवाडी येथील नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here