मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : सतत पडणारा पाऊस, डिझेलची भाववाढ, शेतकऱ्यांनी भाजी उत्पादनाकडे फिरवलेली पाठ अशा विविध कारणांमुळे सर्वसामान्यांच्या किचनमधील भाजीच्या दराला महागाईची तडका बसला आहे. सध्या पितृपक्ष सुरू झाल्यानंतर भाज्यांच्या दरांमध्ये आठ ते दहा टक्क्यांनी वाढ झाली होती. मात्र आता आवक कमी झाल्याने काही भाज्यांच्या दरांनी शंभरी पार केली आहे.
गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथील शेती पाण्याखाली गेली असून दैनंदिन व्यवहारही ठप्प झाले आहेत. त्यामुळे साहजिकच बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या भाजी खरेदी सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेली आहे.
आज मुंबईच्या बाजारपेठेत वांगी ४० रुपये, मटार १६० रुपये, कोथिंबीर ३५ रुपये, शिमला मिरची ५० रुपये, फरसबी ४० रुपये, भेंडी ८० रुपये, गवार ८० रुपये, तोंडली ७० – ८० रुपये, टोमॅटो ५० रुपये, फ्लॉवर ८० रुपये, मेथी ४० रुपये, शेंगा ६० रुपये, कारली ४० रुपये, मिरची ४० रुपये, सुरण ३२ रुपये किलोप्रमाणे विकली जात होती.






