बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) : आपल्या देशाला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त होऊन ७५ वर्ष होत आहेत. त्या अनुषंगाने २०२१ हे वर्ष आपण सारे भारतवासी “स्वातंत्र्याचाअमृत महोत्सव” म्हणून साजरे करीत आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आर्थिक साक्षरता केंद्र औरंगाबाद, महाबँक कृषी संशोधन आणि ग्रामीण विकास प्रतिष्ठान(मार्डेफ) पुणे, आणि बँक ऑफ महाराष्ट्र शाखा बाजार सावंगी ता.खुलताबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी आर्थिक साक्षरता केंद्राचे समुपदेशक क्रांतिकुमार देशपांडे यांनी उपस्थित खातेदार, स्वयं सहायता गटाच्या महिला, ग्रामस्थ, आणि शेतकरी ह्यांना सामाजिक सुरक्षा योजनांची विस्तृत माहिती दिली तसेच डिजिटल बँकिंग तथा कर्ज प्रक्रिये मध्ये स्मार्ट आणि सुज्ञ बँकिंग करण्याचे सुचविले. सर्व महिलांनी आणि कुटुंबातील सर्व पात्र लाभार्थ्यांची पंतप्रधान जनधन खाती उघडून घेण्याची विनंती केली.
गावामध्ये ग्राहक सेवा प्रतिनिधी ज्ञानेश्वर नलावडे रत्नाकर आधिकार नियुक्त असल्यामुळे बँकेची बहुतेक कामे त्यांच्या मार्फत होणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र बाजार सावंगी शाखेत नुकतेच रुजू झालेले शाखाधिकारी प्रदीप कांबळे तसेच सरपंच अप्पाराव सांडु नलावडे, ग्रामसेवक आसाराम बनसोड, पोपट काटकर आणि विलास सोनवणे हे देखील आवर्जून उपस्थित होते. ह्या प्रसंगी बचत गटाच्या पदाधिकारी महिलांशी संवाद साधून आवश्यक कागद पत्रांची त्वरित पूर्तता करून कर्ज घेण्याचे आवाहन ही करण्यात आले. मेळावा यशस्वी करण्यासाठी बँक सखी सुवर्णा नलावडे, ज्ञानेश्वर नलावडे, सचिन जाधव ह्यांनी परिश्रम घेतले.






