बेंगळुरू (कर्नाटक) : कन्नड टीव्ही अभिनेत्री सौजन्या हिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे. त्यानुसार पोलीस तपास करत आहे. सौजन्याच्या आत्महत्येने कन्नड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
सौजन्याने सुसाईड नोटमध्ये ‘माझ्या आत्महत्येसाठी कोणीच कारणीभूत नसून मी स्वत: हे टोकाचं पाऊल उचलण्यासाठी जबाबदार आहे’, असे लिहिलं आहे. तसेच तिने आईवडिलांची माफीसुद्धा मागितली आहे. तिला कोणतीही आरोग्याची समस्या नव्हती. मात्र तिने आयुष्यात ज्या गोष्टींचा सामना केला त्यापासून तिला मानसिक त्रास सहन करावा लागला, असे तिने लिहिले आहे. ज्या लोकांनी तिची मदत केली, त्यांचेही तिने चिठ्ठीत आभार मानले आहेत.
सौजन्याने काही मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. तिने आत्महत्या का केली याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. तिने ज्या कलाकारांसोबत काम केले, त्यांचीही चौकशी पोलीस करणार आहेत. दरम्यान, कन्नड इंडस्ट्रीतील अभिनेत्री जयश्री रामैय्याने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती. मानसिक त्रासाला कंटाळून तिने हे पाऊल उचललं होतं. त्यानंतर आता सौजन्याच्या आत्महत्येची घटना समोर आली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला बिग बॉस कन्नड फेम अभिनेत्री चैत्रा कोतूर हिनेसुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केला होता.






