कपिल सिब्बल यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचा राडा

नवी दिल्ली : काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या येथील निवासस्थानासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनीच आंदोलन केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची दखल काँग्रेस नेत्यांनी घेतली असून शशी थरूर आणि मनिष तिवारी यांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.

बुधवारी (३० सप्टेंबर) सकाळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या घरासमोर जमा झाले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत घराबाहेर तोडफोड केल्याचंही सांगितलं जात आहे.काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केली.

काँग्रेसला कोणताही स्थायी अध्यक्ष नसल्याने पक्षाचे निर्णय कोण घेत आहे, याची आपल्याला कल्पना नाही, असं सिब्बल म्हणाले.गेल्या वर्षी २३ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पक्षप्रमुखांना एक पत्र लिहिलं होतं. त्यामध्ये कपिल सिब्बल यांचाही समावेश होता. २३ ज्येष्ठ नेत्यांनी संघटनेत सुधारणा करण्याची गरज असल्याचं मत त्यावेळी व्यक्त केलं होतं.

कपिल सिब्बल यांच्या वक्तव्यानंतर गुलाम नबी आझाद यांनीही पत्र लिहून काँग्रेसच्या सेंट्रल वर्किंग कमिटीच्या बैठकीची मागणी केलेली आहे. पण याचा विरोध करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी सिब्बल यांच्या घरासमोर गोंधळ घातला.

मनिष तिवारी यांनी या घटनेबाबत ट्विट करून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सिब्बल यांच्या घरासमोरील कारचं नुकसान करण्यात आलं आहे. लोक कारवर चढले होते, त्यामुळे ही कारच्या छताचा भाग दबला गेला आहे. लोकांनी घरावर टमाटे फेकले. ही गुंडगिरी नाही तर काय?” काही वेळानंतर शशि थरूर यांनीही या ट्विटवर आपली प्रतिक्रिया दिली. हा प्रकार लज्जास्पद असल्याचं ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here