अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना समन्स

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी तपासावरुन सीबीआय विरुद्ध राज्य सरकार असा वाद रंगला होता. आता पुन्हा एकदा सीबीआय आणि ठाकरे सरकार वाद रंगण्याची शक्यता आहे. कारण अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे यांना समन्स बजावलं आहे. मात्र या दोघांनीही सीबीआय कार्यालयात जाण्यास नकार दिल्याची माहिती मिळतेय.

दरम्यान माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहेत कुठे असा प्रश्न विचारण्यात येतोय. गेल्या तीन महिन्यांपासून देशमुख त्यांच्या विधानसभा मतदारसंघात म्हणजे काटोलमध्ये फिरकलेलेही नाहीत. तर तिकडे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अटक होण्याच्या भीतीनं देश सोडून परदेशात गेल्याचा, संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांना संशय आहे की परमबीर युरोपातल्या एखाद्या देशात लपले असावेत. पण त्याबाबतचा पुरावा अजूनही या तपास यंत्रणांना मिळालेला नाही.

परमबीर सिंह यांच्याविरोधात तीन ठिकाणी वॉरंट बजावण्यात आलं आहे. मात्र ते या तिनही ठिकाणी उपलब्ध नव्हते अशी माहिती पोलिसांनी २२ सप्टेंबर रोजी चांदिवाल आयोगापुढे सादर केली. त्यामुळे आता परमबीर नेमके आहेत कुठे?, असा सवाल विचारला जातोय. अनिल देशमुख यांना तातडीचा कोणताही दिलासा न देता हायकोर्टानं त्यांची याचिका सुनावणीसाठी २९ सप्टेंबरपर्यंत तहकूब केली होती. २९ सप्टेंबर रोजी देखील ही सुनावणी पुन्हा तहकूब केली असून आता सोमवारी यावर सुनावणी होणार आहे. २३ सप्टेंबर रोजी एकलपीठानं ही याचिका ऐकण्यास नकार दिल्यानंतर गुरूवारी यावर न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जमादार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. मात्र याप्रकरणी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे ईडीची बाजू मांडणार असल्यानं ही सुनावणी ऑनलाईन घेण्याची विनंती सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली. याला विरोध करत अनिल देशमुखांनी तातडीच्या दिलाश्याची मागणी कोर्टाकडे केली. मात्र याचिका ऐकल्याशिवाय कोणताही दिलासा देण्यास नकार देत हायकोर्टानं सुनावणी २९ सप्टेंबर रोजी ऑनलाईन सुनावणीसाठी तहकूब केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here