वडगाव बुद्रूकमध्ये घरफोडी; साडेतीन लाखांवर ऐवज चोरीला

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शहरातील मंगळवार पेठेतील न्यू क्लासिक सोसायटीमधील बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला, तर वडगाव बुद्रुक येथील फ्लॅटमधून ४२ हजार रूपयांचा ऐवज चोरी करून नेला आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सव्वा तीन लाखांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी तुकाराम रामबेद ओझा (वय ३९) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ओझा हे मंगळवार पेठेतील न्यू क्लासिक सोसायटीमधील फ्लॅटमध्ये राहतात. ते एका खासगी कपड्याच्या दुकानात काम करतात. त्यांची पत्नी टेलरिंगचे काम करते. गुरूवारी सकाळी दहा वाजता पती-पत्नी दोघेही कामावर गेले होते. कामावरून आल्यानंतर त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता त्यांच्या कपाटातील सोन्याचे दागिने व इतर ऐवज मिळून ३ लाख २८ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेल्याचे दिसून आले. याप्रकरणी फरासखाना पोलीस तपास करत आहेत.

दुसरी घटना वडगाव बुद्रुक येथील राजयोग सोसायटीत घडली. याप्रकरणी राहूल पांडुरंग जागडे (वय ४८) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार कामाच्या निमित्ताने गुरूवारी दुपारी तीन ते चार वेळात बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचा दरवाजा उचकटून १२ हजार रूपये रोख आणि सोन्याचे दागिने असा ४२ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here