मतदारसंघ पूर्वजांची जहागीर समजणाऱ्या राजाला जनतेने मतदानाच्या माध्यमातून शुध्दीवर आणा : पालकमंत्री अब्दुल सत्तार

दाऊळ गणातील उमेदवार अनिता गिरासे यांच्या प्रचारार्थ साहुर येथे पालकमंत्री यांची जाहीर सभा संपन्न

शिंदखेडा (प्रतिनिधी) : मतदारसंघ हा आपल्या पूर्वजांची जहांगीर समजणाऱ्या राजाला जनतेने मतदानाच्या माध्यमातून आता शुध्दीवर आणण्याचे काम करावे. आपला देश हा लोकशाही देश आहे. लोकशाहीत मतदानाची ताकद फार मोठी आहे. ही पोटनिवडणुक म्हणजे एक संधी असून ज्यांना राजकारणाची चरबी आहे, त्यांना शुध्दीवर आणण्याचे काम जनतेने करावे, असा जोरदार हल्ला भारतीय जनता पक्षावर महाराष्ट्र राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी येथे केला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुक २०२१ च्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून शिवसेना महाविकास आघाडीतर्फे दाऊळ गणातील उमेदवार अनिता नरेंद्र गिरासे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा साहुर गावांत शुक्रवारी दि. ०१ ऑष्टोंबर २०२१ रोजी दुपारी १२ वाजता उत्साही वातावरणात संपन्न झाली.

या सभेला साहुर गावासह दाऊळ गणातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री तथा धुळे जिल्हा पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार, धुळे-नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात, सहसंपर्कप्रमुख हिलाल आण्णा माळी, शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, माजी जि.प.सदस्य ज्ञानेश्वर भामरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष संदीप बेडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष बापू देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेशउपाध्यक्ष बापू महाजन, उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे उपजिल्हासंघटक भाईदास पाटील, कल्याण बागल, शिवसेना तालुकाप्रमुख गिरीश देसले, दोंडाईचा तालुकाप्रमुख ईश्वर पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख गणेश परदेशी, राष्ट्रवादीचे नेते ॲड.एकनाथ भावसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास ठाकरे, धुळे महानगरप्रमुख मनोज मोरे, विठ्ठलसिंग गिरासे, नरेंद्र गिरासे, दोंडाईचा उपतालुकाप्रमुख शैलेश सोनार, युवासेना जिल्हायुवाधिकारी आकाश कोळी, जिल्हा परिषद सदस्या सुनिता सोनवणे, दाऊळ गणातील उमेदवार अनिता गिरासे, विद्याताई मराठे, सुनंदा पवार, सरिता महाजन, विठ्ठल आण्णा, माजी नगरसेवक राकेश पाटील, राकाशेठ रुपचंदाणी, राष्ट्रवादीचे दादाभाई कापुरे, युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप पवार, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख साहेबराव पाटीलसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सभेला मार्गदर्शन करतांना पालकमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, अन्यायाविरुध्द लढणे हे आपले काम आहे. कार्यकर्त्यांनी दवाखाना, पोलीस स्टेशन, शासकीय कामे, विज वितरण विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय ही जनतेशी निगडीत छोटी छोटी कामे केल्यास कार्यकर्त्यांना अडचण येत नाही. जातीपातीचे राजकारण न करता जातीवर कमजोर, कमकुवत लोक निवडणुक लढवतात, असा टोला भारतीय जनता पक्षाचे आमदार जयकुमार रावल यांना नाव न घेता लगावला. महाराष्ट्र राज्याचे जीएसटीचा 32 हजार कोटी रुपये व विकास कामांचा निधीचे 18 हजार कोटी रुपये असा 50 हजार कोटी रुपयांचा हक्काचे निधी केंद्र सरकारने रोखून ठेवला आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार व येथील आमदारांनी महाराष्ट्राचा निधी महाराष्ट्राला मिळावा यासाठी त्यांच्या केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे. यासाठी आवाज उठविला पाहिजे, असा घणाघातही केला. यानंतर पालकमंत्री सत्तार यांनी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या कामांचा गोषवारा जनतेसमोर मांडला. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडुन देण्याचे आवाहन केले.

निवडणुकीची लढाई ही विचारांची लढाई असुन आमदारांनी दिलेल्या त्रासाला जनतेने मतदानातुन उत्तर द्यावे, असे धुळे-नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी सांगितले. तर राजाने प्रजेसाठी कोरोना काळात काय योगदान दिले ? असा खडा सवाल उपस्थित करत जनतेने आमदारांच्या भुलथापांना बळी न पडता लढाऊ बाण्याच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. ही लढाई अन्यायाविरुध्दची लढाई आहे. त्यामुळे जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडुन द्यावे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष डॉ.बापु देशमुख यांनी आवाहन केले. सभेचे प्रास्तावित उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी केले. तर सुत्रसंचालन शिवसेनेचे तालुका समन्वयक विनायक पवार यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here