पैगंबरांचं वादग्रस्त कार्टून रेखाटणारे लॉश विल्क्स यांचं अपघातात निधन

मारकरद (स्वीडन) : मोहम्मद पैगंबर यांचं वादग्रस्त कार्टून काढणारे स्वीडनचे कलाकार लॉश विल्क्स यांचं कार अपघातात निधन झालं.या व्यंगचित्रावरून जगभरात त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रावरून गदारोळ झाला होता.

अपघातासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार विल्क्स पोलिसांच्या गाडीतून जात होते. स्वीडनच्या दक्षिणेकडील मारकरद शहरात ट्रकशी टक्कर होऊन झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.या अपघातात गाडीतील पोलीस कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला. ट्रक ड्रायव्हर या अपघातात जखमी झाला आहे.

विल्क्स ७५ वर्षांचे होते. मोहम्मद पैंगबरांचं व्यंगचित्र काढल्यानंतर त्यांना धमक्याही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना पोलिसांची सुरक्षा पुरवण्यात आली होती.विल्क्स यांनी काढलेलं ते व्यंगचित्र २००७मध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यामुळे अनेक मुस्लीम नाराज झाले होते. मुस्लिमांच्या धारणेनुसार पैगंबरांचं चित्र किंवा व्यंगचित्र काढणं निषिद्ध आहे. त्याआधी एक वर्ष डेन्मार्कमधील वृत्तपत्राने मोहम्मद पैगंबरांसंदर्भात व्यंगचित्रं प्रकाशित केली होती.


स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, अपघातावेळी विल्क्स प्रवास करत असलेली गाडी प्रचंड वेगाने धावत होती. एका प्रत्यक्षदर्शीने अफटोनब्लैडेट वृत्तपत्राला सांगितलं की, विल्क्स् यांच्या गाडीचं संतुलन ढासळलं होतं. वेगामुळे गाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली.समोरून येणाऱ्या ट्रकला थांबण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि ट्रक आणि गाडीमध्ये जोरदार टक्कर झाली. अपघातांतर गाडीला आग लागली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपात्कालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here