मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : शनिवारी रात्री मुंबईहून गोव्याला जात असलेल्या एका क्रूझवर एनसीबीने धाड टाकून अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एनसीबीने ७-८ जणांना ताब्यात घेतलं असून यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश आहे.
एनसीबीच्या या कारवाईनंतर आता राजकीय क्षेत्रातूनही यावर प्रतिक्रीया येण्यास सुरुवात झालेली आहे. केंद्रीय मंत्री आणि RPI चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी, शाहरुखचा मुलगा असो किंवा इतर कोणीही या प्रकरणात सहभागींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं वक्तव्य केलंय.
“फिल्म इंडस्ट्रीत मोठ्या प्रमाणात ड्रग्जची लागण झाली आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ही बाब समोर आली. फिल्म सिटीत ड्रग्जचं जाळं पसरलं आहे. ड्रग्जमुक्त महाराष्ट्र आणि मुंबईसाठी राज्य सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे”, अशी प्रतिक्रीया आठवले यांनी दिली. ते डोंबिवलीत बोलत होते.
दरम्यान एनसीबी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री करण्यात आलेल्या कारवाईत जहाजावर कोकेन, चरस आणि एमडीएमए यासह विविध अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आल्यामुळे दिवसभर प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चा सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या कॉर्डेलिया क्रूझ लाइनर एम्प्रेस जहाजावर रेव्ह पार्टी होणार असल्याची गोपनीय माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर पथकाने धाड टाकत तीन चालणाऱ्या रेव्ह पार्टीचा डाव पहिल्याच दिवशी उधळून लावला.






