नवी दिल्ली : वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय कुस्तीपटू रविंदरने ६१ किलो वजनी गटातील पात्रता फेरीत गतविजेत्या बेका लोमटाझला पराभवाचा धक्का दिला. मात्र, उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या डॅटन डुएन फिक्स याच्याकडून पराभव पत्कारावा लागल्याने रविंदरचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दुसरीकडे कुस्तीपटू यश तुनीर (७४ किलो), संदीप मान (८६ किलो) आणि अनिरुद्ध (१२५ किलो) हेदेखील स्पर्धेतून बाहेर पडले.
ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक पटकाविणाऱ्या रविंदरने तिन्ही सामन्यात प्रतिस्पर्धीला कडवे आव्हान दिले होते.रविंदरने कोरियाच्या किम सुंगवोनवर तांत्रिकदृष्ट्या आघाडी घेत विजयी सलामी दिली होती. यानंतर 2019 मधील वर्ल्ड चॅम्पियनशिपचा विजेता बेका लोमटाझचा पराभव करत मोठे फेरबदल केले होते.
स्पर्धेतील ७४ किलो वजनी गटात यश तुनीरवर रशियाच्या तैमुर बिझोएवने ७-० असा एकतर्फी विजय मिळविला. ८६ किलो वजनी गटात कोरियाच्या किम ग्वानूककडून ४-५ ने पराभूत होण्याआधी राष्ट्रीय विजेता संदीप मानने कडवी झुंज दिली.






