दुबई : शाहीन चक्रिवादळामुळे मरण पावलेल्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे. या वादळामुळे इराणमधील काही मच्छिमार बेपत्ता आहेत. हे वादळ ओमानच्या दिशेने पुढे सरकले असून आता त्याची तीव्रता कमी झाली आहे.
बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा मृतदेह पूराच्या पाण्यातून किनाऱ्यावर आल्याचे ओमानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याशिवाय एका बालकाचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर भूस्खलनामुळे आशियातील दोन विदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आणखी ७ जणांचाही मृत्यू झाला असल्याचे ओमानच्या ‘नॅशनल कमिटी फॉर इमर्जन्सी मॅनेजमेंट’ने म्हटले आहे. मात्र या सर्वांबाबत कोणताही तपशील देण्यात आलेला नाही.
इराणमध्ये बेपत्ता झालेल्या ५ मच्छिमारांपैकी दोगांचे मृतदेह सापडले आहेत. आणखीन ६ मच्छिमार वादळामध्ये मरण पावले असल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या वादळादरम्यान उठलेल्या धुळीच्या वादळात किमान १३२ जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.






