खड्डा चुकविण्याच्या नादात कारने पाच जणांना चिरडले; बहीण-भावासह चार ठार

accident

नागपूर (प्रतिनिधी) : रस्त्यावरील खड्डा चुकविण्याच्या नादात अनियंत्रित कारची पाच जणांना धडक बसून भीषण अपघात घडला. या अपघातात सख्ख्या बहिण-भावासह चार जणांना मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. ही घटना नागपूर- अमरावती राष्ट्रीय महामार्गावर सातनवरीजवळ रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

बंडू सालवणकर (वय- 55), शौर्य सुबोध डोंगरे (वय- 9), शिराली सुबोध डोंगरे (वय- 6), चिन्नू विनोद सोनबरसे (वय- 13) यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे सर्वजण सातनवरी येथील बसस्टाॅपजवळ बसची वाट पाहत उभे होते. यावेळी अमरावतीहून नागपूरच्या दिशेने जाणारी अनियंत्रित कार खड्डा चुकविण्याच्या नादामध्ये सातनवरी येथील बसस्टाॅप जवळच्या दुभाजकावर जोरात आदळून सर्व्हिस रोडवर उलटली. तत्पूर्वी या सुसाट कारने रोडलगत उभ्या असलेल्या 5 जणांना जोराची धडक दिली. त्यात चौघांचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाचही जखमींना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातील चौघांचा वाटेतच मृत्यू झाला. मृतांमध्ये सख्ख्या बहीण- भावासह अन्य दोघांचा समावेश आहे. जखमी महिलेवर नागपूर येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कोंढाळी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here