पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलची अमरावती जिल्हा बँकेवर सत्ता

अमरावती (प्रतिनिधी आसिफ कुरैशी) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी सहकार पॅनलने विरोधी परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवीत बॅंकेवरील सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्यात यश मिळवले आहे.

या निवडणुकीत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनेलचे १२, आमदार बच्चू कडू यांच्या परिवर्तन पॅनलचे चार तसेच एक अपक्ष उमेदवार निवडून आले. यापूर्वी चार जण बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवडून आले आहेत.

जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत बच्चू कडू यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा ६ मतांनी पराभव केला आहे. मात्र त्याच वेळी संजय खोडके यांच्या मतदारसंघातून बबलू देशमुख विजयी झाले आहेत. बबलू देशमुख यांनी सुरुवातीला २ मतदारसंघांतून उमेदवारी दाखल केली होती. त्यापैकी बबलू देशमुख चांदूर बाजार मतदारसंघातून पराभूत झाले. मात्र इतर मागासवर्गीय मतदारसंघातून त्यांनी खोडके यांना पराभूत केले हे विशेष.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच सहकार पॅनलचे उमेदवार विजय मिळवू लागल्याने यशोमती ठाकूर यांच्या गोटात उत्साहाचे वातावरण होते. त्यानंतर परिवर्तन पॅनलचे उमेदवार बच्चू कडू यांनी सहकार पॅनलच्या बबलू देशमुख यांचा पराभव केल्याने सहकार पॅनलच्या समर्थकांत शांतता पसरली. एकेक निकाल हाती येऊ लागताच त्या गटाचे समर्थक जल्लोष करीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here