कनिष्ठ अभियंत्यांनी दिली वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : मीरा-भाईंदर, वसई-विरार महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत यांच्या हत्येची सुपारी त्यांच्याच हाताखालच्या कनिष्ठ अभियंत्यांनी दिली होती. २० लाखांची सुपारी देऊन खांबीत यांना उडविण्यासाठी यूपीच्या दोघा गुंडांना सांगण्यात आले होते. शूट आऊट झाला पण खांबीत बचावले आणि दोघे शूटर मुंबईबाहेर सटकले. मात्र पोलिसांनी शिताफीने तपास करत सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

या प्रकरणात आणखी अटकेची कारवाई होईल, असे सांगत खळबळ उडवून देणाऱया या गुह्याचा जलदगतीने उलघडा केल्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. या प्रकरणात आणखी अटकेची कारवाई होणार असल्याचेही सांगण्यात आले. मीरा-भाईंदर, वसई-विरार महापालिकेचे कार्यकारी अभियंता दीपक खांबीत हे शासकीय वाहनाने कार्यालयातून घराकडे परतत असताना २९ तारखेच्या सायंकाळी सवासहाच्या सुमारास संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या उड्डाणपुलाखाली त्यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फायरिंग केली होती. खांबीत यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडून दोघे पसार झाले होते.

या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई व मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांनी एकत्रित येऊन विविध पथके तयार केली आणि गुह्याचा जलदगतीने तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासले. आजूबाजूच्या ठिकाणीदेखील कसून शोध सुरू केला.

दरम्यान, शूट आऊट करणारे दोघे आरोपी यूपीला पळून गेल्याची पक्की खबर मिळताच पोलिसांनी यूपीत धडक दिली. त्यानंतर भधोई येथून अमित सिन्हा आणि गाजीपुरातून अजय सिंग अशा दोघांना उचलले. चौकशीत खांबीत यांना उडविण्यासाठी दोघा अभियंत्यांकडून २० लाखांची सुपारी मिळाली होती. त्यानुसार खांबीत यांच्यावर फायरिंग केल्याची कबुली दोघांनी दिल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. या प्रकरणात दोघा आरोपींव्यतिरिक्त मि.भा.व.वि. महापालिकेचे दोन कनिष्ठ अभियंता श्रीपृष्ण मोहिते आणि यशवंत देशमुख तसेच कथीत माहिती अधिकार कार्यकर्ता राजू विश्वकर्मा आणि प्रदीप पाठक या चौघांची नावे समोर येताच त्यांनादेखील अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here