अंबरनाथमध्ये अतिवृष्टीमुळे उद्यानाची भिंत कोसळली; दोघांचा मृत्यू

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर शहरात बुधवारी (६ ऑक्टोबर) संध्याकाळी वादळी वाऱ्यासह प्रचंड मुसळधार पाऊस पडला. यावेळी अनेक ठिकाणी होर्डिंग्ज पडण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. तसेच काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या.

या भयावह पावसामुळे जे नुकसान झालं, त्याची भीषणता आता समोर येऊ लागली आहे. अंबरनाथ शहरात महालक्ष्मी नगर गॅस गोडाऊन परिसरात पावसामुळे प्रचंड विपरीत घटना घडली आहे. या परिसरात उद्यानाची भिंत कोसळल्याने भिंतीखाली दबून दोघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

अंबरनाथ शहरात आज सायंकाळच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे अंबरनाथ पूर्वेतील गॅस गोडाऊन परिसरात असलेल्या उद्यानाच्या संरक्षक भिंतीखालची माती खचली आणि भिंत बाजूलाच असलेल्या बैठ्या घरांवर ही संपूर्ण भिंत कोसळली. या घटनेत पाच ते सहा घरांचं मोठं नुकसान झालं. तसंच काही गाड्या देखील भिंतीखाली दबल्याने गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला. या भिंतीचे अवशेष बाजूला करत असतानाच या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण दबले असल्याचं समोर आलं. या दोघांनाही बाहेर काढून तपासलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

संबंधित घटना ही महालक्ष्मी गॅस गोडाऊन परिसरातील उद्यानाजवळ घडली. या दुर्घटनेत ५ ते ६ घरांचं मोठं नुकसान झालं आहे. तसेच भिंतीखाली काहीजण अडकल्याची माहिती समोर आली होती. या घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढलं. यावेळी दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं निदर्शनास आलं.

या घटनेनंतर अंबरनाथ नगरपालिका प्रशासन, अग्निशमन दल, यांच्यासह नायब तहसीलदार यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली. या भिंतीचे ढिगारे उचलण्याचं काम अंबरनाथ नगरपालिकेकडून तातडीने हाती घेण्यात आलं आहे. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली असून ज्या घरांचं नुकसान झालं आहे, त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here