११ ऑक्टोबर रोजी फर्गसन महाविद्यालयात प्रारंभ
पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : ‘ सिंगल युज प्लास्टिक फ्री कॅम्पस’ संकल्पनेच्या जनजागृतीसाठी ‘तेर पॉलिसी सेंटर’या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने पुढाकार घेतला असून या उपक्रमाचा प्रारंभ आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यवरांच्या उपस्थितीत ११ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता फर्गसन महाविद्यालयात होणार आहे. तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक संचालक डॉ.विनीता आपटे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
शहरात’हिरवाईची बेटे’तयार करणाऱ्या,वनश्री जपणाऱ्या ‘टाटा मोटर्स’चा तसेच पर्सिस्टंट फाऊंडेशनच्या अध्यक्षा सोनाली देशपांडे यांचा सन्मान याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
नॉर्वेचे भारतातील राजदूत हँन्स फ्रेडनलंड,युनोचे माजी अंडर सेक्रेटरी जनरल एरिक सॉल्हेम, नॉर्वेच्या भारतातील वाणिज्य दूतावासाचे प्रमुख अर्न जॅन फ्लोलो,तेर पॉलिसी सेंटरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शेंडे,फर्गसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रवींद्रसिंह परदेशी हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.







