भटक्या व मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा – मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

साई द्वारकामाई सेवाभावी संस्थेचे ताराचंद कोते व नागरिकांची मागणी

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : शहरातील विठ्ठलवाडी, गणेशवाडी, प्रसादनगर, गोविंदनगर श्रीकृष्णनगर परिसरातील भटक्या व जखमी मोकाट कुत्र्यांचा शिर्डी नगरपंचायतीने तातडीने बंदोबस्त करून त्यांची नसबंदी करावी, अशी मागणी साई द्वारकामाई सेवाभावी संस्थेचे ताराचंद कोते यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या उपनगरातील रहिवासी व साई द्वारकामाई प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांच्या वतीने मुख्याधिकारी डोईफोडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे, भटक्या कुत्र्यांपासून नागरिकांच्या जीविताला धोका होण्याची शक्यता आहे. त्यांचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. जर असे झाले नाही तर कुत्र्यांच्या हल्ल्यात एखाद्या बालकाला अथवा नागरिकाला गंभीर इजा होऊन आपला जीव गमावण्याची वेळ येऊ शकते. टोळक्या टोळक्याने फिरणाऱ्या या मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी नांदुखी-शिर्डी रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या जीविताच्या दृष्टीने हे धोकादायक आहे.

शिर्डी नगरपंचायतने दिवसेंदिवस वाढत असलेल्या मोकाट कुत्र्यांची नसबंदी करून त्यांचा योग्य प्रकारे बंदोबस्त करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याप्रसंगी साई द्वारकामाई प्रतिष्ठाण सेवाभावी संस्थेचे ताराचंद कोते, प्रशांत गोंदकर, भरत चांदोरे, अमोल सोमवंशी, सचिन पगार, मंगेश निकम, ऋषिकेश माळी, प्रदीप मांडवडे, महेश पाटील उपस्थित होते. या निवेदनावर प्रसादनगर, विठ्ठलवाडी, गणेशवाडी, गोवर्धननगर, श्रीकृष्णनगर येथील स्थानिक रहिवासी नागरिकांच्या सह्या आहेत.

शासन नियमाप्रमाणे संबंधित एजन्सी बरोबर संपर्क साधून या एजन्सीमार्फत या भटक्या व टोळीने फिरणाऱ्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी याप्रसंगी उपस्थितांना दिले. याबाबतचे गांभीर्य ओळखून संबंधित एजन्सी बरोबर समक्ष फोनद्वारे संपर्क साधून नागरिकांना याप्रश्नी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिलासा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here