कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील मुक्ता पब्लिकेशन हाऊस तसेच फार्महाऊसवर गुरूवारी आयकर विभागाने छापा टाकला. आयकर विभागाच्या चार अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.
पुईखडी येथील विजया पाटील यांच्या घरातील कागदपत्रांची अधिकाऱ्यांनी तपासणी सुरू केल्याचे समजते. अजित पवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावरही आयकर विभागाने आज छापेमारी सुरू केली आहे.
दरम्यान, बारामती औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसह तालुक्यातील काटेवाडी येथे गुरुवारी (दि. ७) केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरु आहे. ईडी अथवा आयकर विभागाकडून ही छापेमारी सुरु असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच सुरु झालेल्या या छापेमारीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
माझ्या कोल्हापूर आणि इतर ठिकाणच्या बहिणींच्या घरावर धाडी टाकण्यात आल्याचे अजित पवार यांनी सांगितले. फक्त नाते असल्याने तीन बहिणींवर कारवाई केली जात असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. खालच्या पातळीचे राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्यातील विविध ठिकाणी आयकर विभागाकडून छापे आजसकाळ पासून टाकण्यात येत आहेत. दरम्यान अजित पवार यांच्या नातेवाईकांवर छापा टाकल्यामुळे अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.






