मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंग हे रशियात पळाल्याची चर्चा सुरु आहे. सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. राज्य सरकारनेही सिंग याच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.
भ्रष्टाचारप्रकरणी आज थेट त्यांच्या घराच्या दारावरच मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने नोटीस चिकटवली आहे. वाळकेश्वर परिसरातील नीलिमा इमारतीतील सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर या नोटीसची प्रत चिटकवण्यात आली आहे. परमबीर सिंग यांच्या खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज मुंबईतील परमबीर यांच्या घरावर नोटीस चिकटवली.
खंडणी प्रकरणात १२ ऑक्टोबरपर्यंत चौकशीसाठी हजर राहावे, असे त्यात म्हटले आहे. आता परमबीर दोन दिवसांत गुन्हे शाखेसमोर उपस्थित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ते चौकशीला हजर न राहिल्यास त्यांच्या कायदेशीर अडचणीत वाढ होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.






