ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : धावत्या लोकलमधून उडी मारून मायलेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना विद्याविहार-घाटकोपरदरम्यान घडली. बानू सहदेव मोरे असे मृत महिलेचे नाव असून तिचा सात वर्षांचा मुलगा हा वाचला आहे. बानूच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. घडल्या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.
बानू ही कळवा येथे पती आणि सात वर्षाच्या मुलासोबत राहत होती. तिचा नवरा हा बिगारी काम करतो. शनिवारी रात्री बाराच्या सुमारास बानू आणि तिचा सात वर्षांचा मुलगा हे लोकलने जात होते. लोकल विद्याविहार-घाटकोपरदरम्यान असतानाच बानूने तिच्या मुलाला घेऊन धावत्या लोकलमधून उडी मारली. हा प्रकार लोकलमध्ये बसलेल्या प्रवाशांनी कुर्ला रेल्वे पोलिसांना सांगितला. त्यानंतर कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी गेले. तेव्हा बानू आणि तिचा मुलगा जखमी अवस्थेत आढळून आला.
त्यानंतर पोलीस शिपाई करनुरे यानी त्या मुलाला उचलून नेले. त्या मुलाला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार केल्यानंतर त्या मुलाला सायन रुग्णालयात पाठवण्यात आले. त्या मुलाची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर अपघातात जखमी झालेल्या बानूला पोलिसांनी रुग्णालयात नेले. तेथे तिला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. पोलिसांना अपघाताच्या ठिकाणी एक बॅग आढळून आली. त्या बॅगेत असलेल्या आधारकार्डवरून पोलिसांनी बानूची ओळख पटवत तिच्या नवऱयाला संपर्क केला. बानूच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या नवऱयाचा जबाब नोंदवून घेतला. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.






