नांदुरी (प्रतिनिधी) : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरांची दारे उघडण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मंदिरे उघडल्यानंतर अनेक ठिकाणी भाविक कोरोना नियमांचं पालन करत देवदर्शनासाठी येत आहेत. मात्र वणी सप्तश्रृंगी देवी गडाच्या पायथ्याशी दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याचे वृत्त समोर येत असून, यामुळे नवरात्रौत्सवाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.
याबाबत माहिती अशी की, नांदूरी नाका येथून गडावर वाहन सोडण्यास मनाई आहे. मात्र भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून नांदूरी नाक्यावरून देवीच्या गडावर जाण्यासाठी भाविकांसाठी खास बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. असं असूनही काही भाविकांनी त्याचं वाहन गडावर सोडण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातली आहे. रात्रीच्या सुमारास आलेल्या २० ते २५ जणांनी पोलिसांसोबत वाद घातला आहे. ही सर्व घटना घटनास्थळी जमलेल्या काहीजणांनी आपल्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली आहे.
या वादामुळे सप्तश्रृंगी देवी गडाच्या पायथ्याशी बराच वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तरुणांची वाढती दादागिरी पाहून संबंधित पोलिसांनी अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाचारण केलं. अतिरिक्त पोलीस येताच या तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल होत आहे.






